बोधकथा - उंटावरून शहाणा
एकदा एका गावातील शेतकऱ्याचे वासरू मडक्यातील पाणी पिण्यासाठी गेले; पण पाणी पिऊन झाल्यानंतर त्याला त्याची मान बाहेर काढता येईना. दुदैवाने त्या वासराचे डोके त्या मडक्यात अडकून बसले. शेतकऱ्याने बराच प्रयत्न केला; पण त्याचे डोके काही बाहेर निघेना. मग आजूबाजूची माणसे गोळा झाली. त्यांनीसुद्धा प्रयत्न केला. पण त्या वासराचे डोके काही बाहेर आले नाही. मग त्या माणसांनी एका शहाण्या माणसाला सल्ला देण्यासाठी बोलावले; पण गंमत अशी की तो शहाणा माणूस उंटावरूनच आला आणि म्हणाला, मी या वासराची सुटका करेन; पण मला त्याच्याजवळ जावे लागेल आणि मी काही उंटावरून खाली उतरणार नाही.
तुम्हाला या शेतकऱ्याची भिंत पाडावी लागेल. मग त्या शेतकऱ्याची भिंत पाडली. तो माणूस तसाच उंटावरून त्या वासराजवळ गेला आणि म्हणाला, या वासराची मान कापा; पण डोके शाबूत राहील, याची काळजी घ्या आणि मगच मडके फोडा. म्हणजे तुमचा प्रश्न सुटेल. जमलेली माणसे अवाक् होऊन त्या शहाण्याचे बोल ऐकतच राहिली, आपण काय म्हणून याला बोलावले आणि याच्या सांगण्यावरून या गरीब शेतकऱ्याची भिंत पाडली, असे लोकांना वाटू लागले; पण आता काही इलाज नव्हता. भिंत तर पाडली गेली होती आणि वासरू तर अडकून बसले होते.
( तात्पर्य : मूर्ख माणसांचे सल्ले घेऊ नयेत. )
No comments:
Post a Comment