बोधकथा - योग्य धोरण
एक कोल्हा एका खोल तलावात पडला. यातून त्याला बाहेर निघता येईना. इतक्यात तिकडून एक तहानलेला बोकड आला. तलावात कोल्ह्याला पाहून त्याने विचारले, काय हो, आतलं पाणी चांगलं पिण्यासारखं आहे का? ही आयतीच संधी पाहून कोल्ह्याने त्या पाण्याची खूप स्तुती केली. बोकडालाही खूप तहान लागली असल्या कारणाने काही विचार न करता त्याने आत उडी घेतली.
पोटभर पाणी प्याल्यावर मात्र मग ते दोघे बाहेर कसं पडायचं याचा विचार करू लागले. कोल्हा एकदम म्हणाला, बघ, एक चांगली कल्पना सुचलीय. मला तू मदत केलीस तर आपल्या दोघांचीही सुटका होईल. असं कर, तू पुढचे दोन्ही पाय या तलावाच्या भिंतीना लाव आणि शिंगे ताठ करून उभा राहा. म्हणजे तुझ्या शिंगावरून उडी मारून मी वर जातो. मग तुलाही मी वर ओढून घेईन.
बोकडाने आनंदाने कोल्ह्याच्या सांगण्याप्रमाणे केले. ताबडतोब त्याच्या पाठीवरून, खांद्यावरून आणि शिंगांवरून अलगद उडी मारून कोल्हा वर गेला आणि चालू लागला. बोकडाने तक्रार केल्याबरोबर तो थोडासा मागे वळून म्हणाला, मित्रा, तुझ्या या लांब दाढीपेक्षा तुझ्या डोक्यात थोडी अक्कल जास्त असती तर बरं झालं असतं. आत उडी मारण्यापूर्वी परत वर कसं यायचं याचा विचार केला होतास का?
( तात्पर्य : अखेरपर्यंतचा सर्व विचार केल्याशिवाय धोरणी माणूस कुठल्याही कामाला हात घालत नाही, )
No comments:
Post a Comment