छत्रपती शिवाजी महाराज - निबंध
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,आपल्या देशातील महान मराठा शासक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते. शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जवाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले. त्यांना मराठी साम्राज्याचे संस्थापक देखील म्हटले जाते.
शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. शिवरायांच्या काळात प्रजा सुखी आणि समृद्ध होती.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या, त्या शिवरायांना लहान असताना युद्धाच्या गोष्टी सांगत असत. रामायण महाभारतातील कथा सुद्धा त्या सांगायच्या. या सर्व गोष्टींचा शिवरायांवर खूप प्रभाव झाला.
ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली.
शिवरायांच्या या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, मुरारबाजी, येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांचीही बलिदान देतांना मागेपुढे पाहिले नाही.
शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजाहित दक्ष राजे होते.
शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे. शिवाजी महाराज गनिमी कावा युद्ध कलेचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. मराठा साम्राज्याचे जनक शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 साली अवघ्या पन्नास वर्षाच्या वयात निधन झाले. परंतु आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत.