विणकराचे नाणे
एका गरीब विणकराने एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या पत्नीसाठी एक सुंदर साडी विणली. त्या श्रीमंत व्यापाऱ्याने बक्षिस म्हणून त्या विणकराला एक सोन्याचे नाणे दिले. त्यामुळे आनंदित होऊन त्या विणकराने ते नाणे आपल्या पत्नीला दाखविले. त्याची हुशार पत्नी त्याला म्हणाली 'पावसाळ्याच्या काळात आपल्याला याची गरज पडेल म्हणून हे नाणे जपून ठेवूया.'
पत्नीने दिलेला योग्य सल्ला पटल्यामुळे विणकाराने तो मान्य केला. दुसऱ्या दिवशी कामावर जाताना त्याला बादशहाच्या महालाच्या कुंपण भिंतीत एक कोनाडा दिसला. त्याने ते नाणे त्या कोनाड्यात लपवून ठेवले.
एके दिवशी विणकराची पत्नी त्याला म्हणाली 'आपण नवा हातमाग आणण्यासाठी ते सोन्याचे नाणे वापरूया.' पत्नीची सूचना मनापासून आवडल्याने विणकराने दुपारच्या उन्हाची पर्वा न करता बादशहाच्या महालाचा रस्ता धरला.
भरदुपारी एका उघड्याबंब माणसाला महालाजवळ फिरताना पाहून बादशहा चक्रावला. 'त्या माणसाला त्वरीत माझ्यासमोर हजर करा.' बादशहाने सैनिकांचा हुकूम दिला. 'भर दुपारी उन्हामुळे रस्ता ओस पडला असताना, तू महालाजवळ हसत का धावतो आहेस? बादशहाने विचारले. त्या विणकराने अधीरतेने त्या लपवलेल्या नाण्याची गोष्ट सांगितली.
'ठिक आहे, बादशहा म्हणाला, 'मी तुला सोन्याचे नाणे देतो, तू मग घरी जाऊ शकतोस.' 'तसे असेल तर मी माझे नाणे उद्या घेऊन जाईन. विणकर उत्तरला. बादशहाने कुतूहलाने विचारले, 'जर मी तुला दोन सोन्याची नाणी दिली तर ती तुला पुरतील ना?''तरी मी दुसऱ्या दिवशी माझे नाणे घेईनच, विणकर हट्टीपणाने म्हणाला.
बादशहानेही आपले म्हणणे सोडले नाही व नाण्यांची संख्या वाढवत राहिला. पण विणकर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला.. त्यामुळे संतापून बादशहा शेवटी म्हणाला, 'जर मी तुला माझे अर्धे राज्य दिले तर?' त्या गरीब विणकराने आनंदाने आपली मान हलवली. 'हुश्श!' असे बोलत बादशहाने सुटकेचा निश्वास टाकला व आपल्या कारभाऱ्यांना तशी व्यवस्था करण्याचा आदेश दिला.
जहाँपन्हाह', विणकर म्हणाला, "कृपया मला तुमच्या राज्याच्या दक्षिणेकडील भाग द्या कारण त्या भागात मी माझे नाणे लपविले आहे!'
No comments:
Post a Comment