बोधकथा - योग्य पात्रता - Moral Story
अकबर बादशाह गुणग्राहक होता. त्याची कीर्ती ऐकून त्याच्या दरबारात एक चित्रकार आला व त्याने एक सुंदर चित्र काढले. बादशाहने त्याला बक्षीस देण्याचे ठरवले. आता त्याला बादशाहा मोठे बक्षीस देणार, हे लक्षात आल्याने दरबारातील इतर मंडळी जळफळली. बादशाह कारण नसताना एका सामान्य चित्रकाराला बक्षीस देत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले; पण बादशाहच्याच दरबारातील काहींना हे मत मान्य नव्हते. या गुणी चित्रकाराची कदर करावी, असे त्यांना वाटले. शेवटी एकाने सुचवले की, हे चित्र दरबाराबाहेर चौकात लावावं व सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आजमावावी. लोकांना ते आवडलं तर चित्रकाराला बक्षीस द्यावे. हे कसं करावं? असे बादशाहाने विचारताच सरदार म्हणाला, 'चित्रात जेथे चूक आढळेल तेथे प्रजेने फुली मारावी, असे जाहीर करावे.'
बादशाहाला ही कल्पना पसंत पडली. त्यानंतर ज्याने त्याने येऊन चित्रावर जागोजाग फुल्या मारल्या. ते पाहून बादशाहाने त्याला बक्षीस द्यायचे नाकारले. त्याला वाईट वाटलं. तो अखेर बिरबलाकडे आला. बिरबिलाने बादशाहाकडे त्याची रदबदली केली; पण बादशाह काही ऐकायला तयार नव्हता. बिरबलाने चित्रकाराला सुचविले की, त्याने असेच दुसरे चित्र काढावे. चौकात लावावे व खाली लिहावे जो कोणी असे हुबेहुब चित्र काढू शकेल, त्यानेच फुली मारावी. यावेळी मात्र चित्रावर एकहीं फुली पडली नाही.
अकबरालाही त्याची चूक कळली.
तात्पर्य : पात्रता नसताना दुसऱ्याच्या चुका काढणे खूप सोपे असते. स्वत:त बदल घडवणे खूप अवघड.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق