बोधकथा - कर्तृत्व
एका गावात एक आजी आपल्या दोन नातींसह राहात होती. त्यांच्या घरी एक संन्यासी पाहुणा आला. आजीने त्यांचा पाहुणचार केला. ते सारेजण गप्पा मारत बसले असतानाच एक वार्ता आली की, शेजारचे कोणीतरी मरण पावले.
आजी आपल्या नातीला म्हणाली, जा, गं. जरा पाहून ये बरं. त्याला सद्गती मिळाली की दुर्गती? थोड्या वेळातच नात धावत आली म्हणाली, आजी त्याला सद्गती मिळाली. गप्पा पुन्हा सुरू झाल्या. एवढ्यात आणखी कोणीतरी मरण पावले असल्याची बातमी आली. पुन्हा तसेच घडले. यावेळी मात्र नात परत येऊन म्हणाली, आता याला दुर्गती मिळाली.
न राहवून संन्यासाने त्या आजीला विचारलं, हे कसं शक्य आहे? तेव्हा आजी म्हणाली, साधी गोष्ट आहे महाराज, जो माणूस मेल्यानंतर माणसे रडतात त्यांना त्याची पोकळी जाणवते. त्याला सद्गती मिळते आणि दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती मेल्यावर माणसे म्हणतात, जमिनीचा भार हलका झाला, पीडा गेली. अशाला दुर्गती मिळते.
मरणानंतर सुद्धा नातेवाईकांना, मित्रमंडळींना हवाहवासा वाटणारा असेल त्याला सद्गतीच मिळाली, असे म्हटले तर ते चुकीचे आहे का? यावर संन्याशी म्हणाला, खरंय आजी तुमचा इतका देश फिरलो. साधना केली; पण जीवनाचं सत्य मात्र आज कळलं.
(तात्पर्य : आयुष्यात असे कर्तृत्व करावे की, आपण गेल्यानंतरही
लोक आपली आठवण काढत राहतील )
No comments:
Post a Comment