बोधकथा - आंधळा सूड
एका जंगलामध्ये एक साप आणि एक गांधीलमाशी यांचे नेहमी भांडण होत असे. नेहमी गांधीलमाशी सापाच्या डोक्याला चावा घेऊन पळून जायची. सापाला नेहमी आपल्या विषाबद्दल गर्व असायचा. मी माझ्या विषाने शत्रूचा एका मिनिटात नि:पात करू शकतो, असा त्याच्यात अहंकार झाला होता. पण गांधीलमाशीच्या पुढ्यात मात्र तो काही करु शकत नव्हता. गांधीलमाशी जेव्हा त्याच्या डोक्याचा चाव घेऊन पळून जायची तेव्हा तीसुद्धा आपल्या जंगलच्या प्राण्यांमध्ये फुशारक्या मारायची बघा, मी त्या सापाला चावून चावून हैराण करते; पण तो माझं काही वाकडं करू शकत नाही.
आहे की नाही मजा?
त्या सापाचे मित्र या गांधीलमाशीच्या फुशारकीबद्दल जेव्हा त्याला सांगत तेव्हा मात्र तो खूप संतापे; पण तो काही करु शकत नव्हता.असेच एके दिवशी पुन्हा गांधीलमाशी त्याच्या डोक्याचा चावा घ्यायला आली. आता मात्र तिचे धाडस वाढले होते. ती क्षणाक्षणाला त्याचा चावा घेऊ लागली. साप दु:खाने आणि संतापाने वेडा झाला. त्याचवेळी एक बैलगाडी तेथून जात होती. संतापाच्या भरात सापाने आपले डोकें त्या बैलगाडीच्या चाकाखाली घातले त्याचक्षणी साप आणि गांधीलमाशी दोघेही मरण पावले.
तात्पर्य : आंधळ्या सूडाचा मार्ग मृत्यूच्या दारापर्यंत जातो.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق