बोधकथा - संघर्ष
एका नदीच्या प्रवाहातून दोन तृणकाड्या वाहात होत्या. नदीचा प्रवाह तसा जलदच होता, सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे तशा लाटाही निर्माण झाल्या होत्या; पण या दोन तृणकाड्यांमध्ये फरक इतकाच होता की एक प्रवाहाच्या दिशेने वाहात होती आणि दुसरी काडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहात होती.
जणू प्रवाहाला थोपवू पहात होती. विरुद्ध दिशेने जाणारी काडी म्हणायची, मी मेले तरी चालेल, पण पाण्याला पुढे जाऊ देणार नाही. तरीही ती काडी पाण्याबरोबर वाहात होती. पाण्याला रोखण्याचा तिचा प्रयत्न नदीला माहीतही नव्हता. या क्षुद्र तृणकाडीबद्दल तिला काहीच माहीत नव्हते.
नदीच्या दृष्टीने ती काडी पाण्यात असली काय अन् नसली काय सगळे सारखेच; पण तृणकाडीच्या जीवनात मात्र फरक पडला होता. तिने काहीही धडपड केली नाही तरी ती जिथे पोहोचायची होती तिथे पोहोचणारच होती; पण पाण्याशी संघर्ष करण्याच्या नादात तिचे आयुष्य मात्र संघर्षमय होऊन गेले होते.
( तात्पर्य : संघर्षामुळे जीवनाच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात.)
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق