बोधकथा - शब्दज्ञान
एका फकिराजवळ एक प्राध्यापक गेले आणि त्याला विचारू लागले, सत्य काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. फकीर म्हणाला, सत्य तर तुमच्याजवळ आहे. हे जाणून घेण्यासाठी इथं कशाला आलात? शब्दज्ञानाने तुमचं डोकं गच्च भरलं आहे. एवढे बोलून तो " फकीर गप्प झाला. त्याने त्या प्राध्यापकांसाठी चहा केला. तो कपबशीत चहा ओतू लागला. कप भरून गेला, बशीही भरणार-तरीही फकीर चहा ओतत होता.
इतक्यात प्राध्यापक म्हणाले, आता थांबा की, त्या कपबशीत एक थेंबही चहा मावणार नाही. फकीर म्हणाला, तुम्हाला दिसतंय की, आता चहा ओतला तर तो सांडेल. तसंच तुमचं झालंय. तुमच्या डोक्यातील जागा शब्दज्ञानानं भरून गेली आहे. त्यात आणखी काही भरलं तर वेड लागेल. सत्य जाणण्यासाठी अगोदर शब्दज्ञान विसरा.
(तात्पर्य : ज्ञान जाणून घेण्यासाठी मन मोकळे हवे. विचारांची गर्दी असेल तर सगळे ज्ञान पाण्यात जाते)
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق