वाक्य प्रकार - केवल ,मिश्र व संयुक्त
वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने वाक्यांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात:
(1) विधानार्थी वाक्य : ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात
उदा., मी शाळेत जातो.
(2) प्रश्नार्थी वाक्य : ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात
उदा., तू कोठे जातोस?
(3) उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य
म्हणतात. उदा., अरेरे! केवढा मोठा अपघात झाला !
(4) होकारार्थी (करणरूपी) वाक्य : जेव्हा विधानात होकार असतो, तेव्हा त्या वाक्यास होकारार्थी किंवा
करणरूपी वाक्य म्हणतात. उदा., भारताचा विजय झाला.
(5) नकारार्थी (अकरणरूपी) वाक्य : जेव्हा विधानात नकार असतो, तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी किंवा
अकरणरूपी वाक्य म्हणतात. उदा., भारताचा पराजय झाला नाही.
क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात :
(1) स्वार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्यास स्वार्थी (स्व-अर्थी) वाक्य म्हणतात. उदा., सुधीर शाळेत गेला.
(2) आज्ञार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना किंवा उपदेश या
गोष्टीचा बोध होतो, त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदा., चांगला अभ्यास करा.
(3) विध्यर्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, इच्छा, योग्यता शक्यता या
गोष्टींचा बोध होतो, त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. उदा., चांगला अभ्यास करावा.
(4) संकेतार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर तमुक होईल अशी अट किंवा संकेत याचा अर्थ निघत असेल, तर त्यास संकितार्थी वाक्य म्हणतात. उदा., जर चांगला अभ्यास केला, तर उत्तम यश मिळेल.
एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात :
(1) केवल वाक्य : ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते; त्यास केवल वाक्य म्हणतात. उदा., अजय दररोज अभ्यास करतो.
(2) मिश्र वाक्य : एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोड़ून जे एक
संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्र वाक्य म्हणतात. उदा., जर अभ्यास केला तर आपण पास होऊ.
(3) संयुक्त वाक्य : दोन केवल वाक्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक
जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. उदा., अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق