बोधकथा - संकुचित वृत्ती - Moral Story
एका छोट्याशा विहिरीतच आयुष्य व्यतीत करणाऱ्या बेडकाला समुद्रात राहणारा बेडूक भेटला. विहिरीतल्या बेडकाने विचारले, कसा असतो समुद्र? यावर समुद्रातल्या त्या बेडकाने माहिती दिली. विहिरीतल्या बेडंकाने जरा लांब उडी मारून विचारले, इतका मोठा असतो का समुद्र? समुद्री बेडकाने उत्तर दिले नाही. मग पुन्हा विहिरीतील बेडकाने अजून मोठी उडी मारली आणि विचारले, इतका मोठा असतो का समुद्र?
दुसऱ्या बेडकाने नकारार्थी मान हलवली. असे बऱ्याच वेळ झाले. विहिरीतील बेडूक विहिरीत उड्या मारायचा आणि समुद्रातील बेडूक त्याला म्हणायचा, यापेक्षा मोठा समुद्र आहे. असा जन्मभर उड्या मारत राहिलास तरी समुद्राएवढे अंतर तू दाखवू शकणार नाहीस. हे ऐकून त्या विहिरीतील बेडकाला राग आला. तो म्हणाला, तू खोटे बोलतो आहेस. या विहिरीपेक्षा जग मोठे असूच शकत नाही.
मला अंतर मोजता येणार नाही, असा कोणताच समुद्र या जगातच नाही...! हे उत्तर ऐकून समुद्रातील बेडूक निघाला. जाताना म्हणाला, याला कारण तुझी संकुचित वृत्ती.
तात्पर्य : विहिरीसारखी कुंपणे घालून आपण त्या विहिरीतल्या बेडकासारखेच जगत असतो. अशी बंधने झुगारून देणे आवश्यक असते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق