बोधकथा - लांडग्याचे नशीब - Moral Story
एकदा एक गाडीवान आपल्या गाडीतून मासे घेऊन चालला होता. जंगलातून भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. मासे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मासे मिळवायचे कसे, याचा विचार तो करू लागला. त्याला एक युक्ती सुचली.
गाडीवान आपल्याच नादात गाडी चालवत पुढे निघाला होता. वाटेत त्याला हा कोल्हा मरून पडलेला दिसला. त्याने विचार केला की या कोल्ह्याचे कातडे विकून आपल्याला चार पैसे मिळतील, म्हणून त्याने कोल्ह्याच्या शेपटीला धरले आणि त्याला मागे टाकले.
कोल्ह्याने गाडीवानाचे लक्ष नाही, असे पाहून मनसोक्त मासे खाल्ले आणि गाडीतून उडी मारून निघून गेला. त्याला गाडीतून उडी मारताना एका लांडग्याने पाहिले. लांडग्याने त्याला असे विचारले की तू गाडीमध्ये काय करत होता. कोल्ह्याने काय ते सांगितले. मग लांडगाही मेल्याचे सोंग घेऊन गाडीपुढे पडला.
गाडीवानाला खूप आनंद झाला. त्याला असे वाटले,की लांडग्याचेही कातडे विकून आपल्याला खूप पैसे मिळतील. तो लांडग्याला उचलायला गेला तर तो खूप जड वाटला. गाडीवानाला लांडगा उचलता येईना. म्हणून मग त्याने एक पोते आणले, त्यात लांडग्याला घातले आणि ते पोते आपल्या गाडीला घट्ट बांधले आणि गाडीबरोबर फरफटत नेले.
तात्पर्य : एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरलेली गोष्ट दुसऱ्यासाठीही तशीच ठरेल, असे नाही.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق